प.पू.डॉ.भाईनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे १६ सप्टेंबरला नाशिककडे प्रस्थान

वेळापूर येथील महानयोगी प.पू.डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांचे गुरू प.पू.सद्गुरू गजानन महाराज गुप्ते यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र वेळापूर ते श्री क्षेत्र नाशिक अशा २१ दिवसांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पालखी सोहळ्याचे शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र नाशिककडे प्रस्थान होत असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.स्वामीराज महाराज भिसे यांनी दिली.
वेळापूर येथील श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वेळापूरचे ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिरासमोरील श्री खंडोबा मंदिरात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील या उभयतांच्या हस्ते श्रींची प्रस्थान पूजा व आरती करण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता हा सोहळा प.पू.डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या श्रीधर कुटीकडे दुपारचा नैवेद्य व भोजनासाठी मार्गस्थ होईल. महाप्रसादानंतर हा सोहळा श्री क्षेत्र नाशिककडे प्रस्थान ठेवेल. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम शंकरनगर-अकलूज येथे असून हा सोहळा रेडणी, लासुर्णे, बारामती, उंडवडी सुपे, दौंड, काष्टी, मढे वडगांव, घारगांव, खडकी, अहमदनगर, नागापूर, वांबुरी फाटा, राहुरी, कोल्हार, लोणी, तळेगांव दिघे, नांदुर शिंगोटे, सिन्नर, शिंदेगाव मार्गे श्री क्षेत्र नाशिक येथे सोमवार दि.०३ ऑक्टोबर रोजी पोहोचेल.
मंगळवार दि.४ ऑक्टोबर रोजी प.पू.गजानन महाराज गुप्ते यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता पालखी परिक्रमा, पादुकांना गोदावरी स्नान, सकाळी १० वाजता ह.भ.प.स्वामीराज महाराज भिसे यांचे पुण्यतिथीचे किर्तन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहेत. बुधवार दि.५ रोजी नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व सप्तश्रृंगी वणी दर्शन, गुरूवार दि.६ रोजी श्री क्षेत्र आळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री क्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराज दर्शन, शुक्रवार दि.७ रोजी श्री क्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज दर्शनानंतर हा सोहळा श्री क्षेत्र वेळापूरकडे मार्गस्थ होईल. रात्रौ हा सोहळा वेळापूर मुक्कामी पोहोचेल.
या पालखी सोहळ्यात बावडा जि.पुणे येथील भारूडसम्राट ह.भ.प.लक्ष्मण महाराज राजगुरू, सणसर जि.पुणे येथील भारूडसम्राट ह.भ.प.सावता महाराज फुले, उदयनगर जि.सोलापूर येथील भारूडसम्राट ह.भ.प.अनिल महाराज माने, माळखांबी जि.सोलापूर येथील भारूडसम्राट ह.भ.प.किशोर महाराज लोखंडे व खुडूस जि.सोलापूर येथील भारूडसम्राट ह.भ.प.अनिल महाराज केंगार यांच्या भारूडाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा पालखी सोहळा संपूर्ण मोफत असून परतीचा प्रवास मात्र साधकांनी स्वखर्चाने करावयाचा आहे. ज्या साधकांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे अशा साधकांनी श्री आनदंमूर्ती सेवा मंडळ, वेळापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भिसे यांनी केले आहे. यावेळी सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष अनंत होडगे, प्रदिप खराडे-पाटील, संजय उरणे, लक्ष्मण वाघे, भगवान लोहार, अजित साठे, सौ.चंद्रकला भिसे, अजित कुरळे, डॉ.औदुंबर कचरे आदि उपस्थित होते.

• २१ दिवसांचा पायी दिंडी पालखी सोहळा
• दि.१६ सप्टेंबरला होणार श्री खंडोबा मंदिरातून प्रस्थान
• जयसिंह मोहिते-पाटील व सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते प्रस्थान पूजा
• सोहळ्यात ह.भ.प.लक्ष्मण महाराज राजगुरू, ह.भ.प.सावता महाराज फुले, ह.भ.प.अनिल महाराज माने, ह.भ.प.किशोर महाराज लोखंडे व ह.भ.प.अनिल महाराज केंगार यांच्या भारूडाचे आयोजन

No comments