कलाकाराला वय लागत नाही : आमसिद्ध भिसे
वेळापूर दि. १६: कला ही प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये असते. त्याला फक्त प्रोत्साहन आणि संधीची आवश्यकता असते. कलेला वय लागत नाही. आनंदमूर्ती प्रॉडक्शनने अशा होतकरू कलावंतांना संधी देवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे मत पुण्याच्या माजी सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन आमसिद्ध भिसे यांनी व्यक्त केले.
वेळापूर येथील आनंदमूर्ती फिल्म प्रॉडक्शनने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘७० वा’ या लघुपटाची निर्मिती केली. वेळापूर येथील स.म.शंकरराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात चित्रीत करण्यात आलेल्या या लघुपटामध्ये वेळापूरचा बाल कलावंत सौरभ बनसोडे याने उत्कृष्ट अभिनयाद्वारे भूमिका साकारली. त्याबद्दल त्याचा भिसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी सौरभचे वडील बाबासाहेब बनसोडे, आई दुर्गादेवी बनसोडे, बहिण प्रज्ञा बनसोडे, आनंदमूर्ती प्रॉडक्शनचे वैभव आंबेकर, औदुंबर भिसे, योगीराज भिसे, रोहित देशमुख, सुरज ननवरे, प्रियदर्शन माने, निशा कापरे, विशाल बडके, किरण लोंढे आदि उपस्थित होते.
या चित्रपटाचे लेखक प्रा.मनोज गायकवाड म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. या ७० वर्षात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली असली तरी या देशातील भटक्या विमुक्त समाज आजही विकासापासून वंचीत आहे. असे असले तरी देशभक्ती, देशप्रेमाने हा समाज भारावून गेला आहे. या समाजाच्या वेदना या लघुचित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या लघुचित्रपटासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, स.म.शंकरराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ए.जी.शेख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
No comments