कोळेगाव येथील बिरोबा देवस्थानाला तीर्थक्षेत्र 'क' दर्जा

वेळापूर लाइव्ह टीम । कोळेगाव

माळशिरस तालुक्यातील कोळेगावचे ग्रामदैवत
श्री बिरोबा देवस्थानास तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'क' दर्जा मिळाला असून देवस्थानाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती माळशिरस तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ.रुपाली बेंडगुडे यांनी वेळापूर लाइव्हशी बोलताना सांगितले.
यावेळी सौ.बेंडगुडे म्हणाल्या, कोळेगांवच्या ग्रामदैवत बिरोबा देवाची यात्रा वर्षातून दोन वेळा भरत असते. वर्षभरात देवाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे देवस्थानाला 'क' दर्जा प्राप्त झाला आहे तर विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.
देवस्थानाला 'क' दर्जा व ५० लाख रुपयांच्या निधीसाठी विधान परिषदेचे आमदार रामहारी रुपनवर यांनीही पाठपुरावा केल्याचे यावेळी सौ.बेंडगुडे यांनी सांगितले.

No comments