महिलांनी भरली आधुनिक सावित्री साधना बनकर यांची खणा-नारळाने ओटी
विधवा जागृती कार्यासाठी समाज मान्यतेची मोहर
माजी पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रकल्पाधिकारी स्वर्गीय रमेश निवृत्ती बनकर यांच्या प्रथमश्राद्ध दिनी उपस्थित महिलांनी त्यांच्या विधवा पत्नी साधना रमेश बनकर यांची हळदीकुंकवाने, खणानारळाने ओटी भरून समाजपुढे चांगले उदाहरण सादर केले. वेळापूरचे बनकर यांची सून, पलूसच्या माळी कुटुंबाची कन्या असणाऱ्या साधना बनकर यांनी पतीच्या अपघाती निधनांनंतर स्वतःला सावरत सासर आणि माहेरच्या पाठिंब्यावर समाजातील विधवा महिलांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिले. वर्षभर विधवा महिलांच्या कुटुंबाना भरीव आर्थिक, शैक्षणिक हातभार लावतानाच विधवांच्या प्रबोधनाचे कार्यही हाती घेतले.
सोमवारी (दि. 24) झालेल्या प्रथमश्राद्धाच्या पारंपरिक विधिदरम्यान उपस्थित महिलांनी स्वर्गीय रमेश बनकर यांच्या प्रतिमेसमोर साधना बनकर यांना हळदीकुंकू लावत ओटी भरली. कुटुंबीय, आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत या प्रसंगी नवसुशिक्षित महिलांसोबतच मध्यमवयीन आणि वृद्ध सुवासिनीनी पुढे येऊन साधना बनकर यांना हळदीकुंकू लावून नवविचाराचे लेणं समाजमनावर कोंदत होत्या. साधना बनकर यांनी हाती घेतलेल्या विधवा प्रबोधनाच्या कामात आम्हीही सहभागी असल्याचा हा संदेश होता.
गेल्या वर्षभरात स्व.श्री.रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थपणा करून साधना बनकर यांनी वेळापूर, बार्शी, पलूस, येवला या परिसरात गरीब विधवा कुटुंबातील होतकरू हुशार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक मदत, सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या आवाहनानुसार सायकल बँक योजनेसाठी पन्नास हजारांचे योगदान, विधवा महिला प्रबोधन उपक्रम राबविले आहेत.
मला समाजाने नव्या बदलांसह स्वीकारले, सन्मान दिला. हाच सन्मान माझ्या विधवा भगिनींना मिळावा. विधवेच्या वेदना आणि सामाजिक गरजा समाजाने समजून घ्याव्यात.
- साधना बनकर, संस्थापक अध्यक्षा, स्व.श्री.रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट, वेळापूर.
Post Comment
No comments