समाज कंटकांना जात, धर्म नसतो : बाळासाहेब धांइंजे

फोंडशिरस विटंबना प्रकरण, आठ दिवसांत आरोपी न सापडल्यास हिंसक आंदोलनाचा इशारा

वेळापूर ता. ११

ज्या महापुरुषांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे त्या महापुरुषांची विटंबना करणे ही समाजसाठीच नाहीतर संपूर्ण जगाला लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या समाज कंटकांनी हे कृत्य केले आहे त्यांचा जन्म हायब्रेड आहे. अशा समाज कंटकाना जात धर्म नसतो. वेळापूर येथे आयोजित निषेध सभेत बोलताना आर.पी.आय. चे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब धांइंजे यांनी फोंडशिरस येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. त्याचबरोबर येत्या आठ दिवसांत पोलिसांनी आरोपीस पकडले नाही तर पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात हिंसक आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना धांइंजे म्हणाले की, जे लोक अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागण्या करतायेत त्यांच्याशी खुलेआम चर्चा होऊद्या. दलितांवर अन्याय करण्यासाठी हे लोक अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागण्या करत आहेत. अट्रॉसिटी कायदा हा कुणाच्या घराचा कायदा नाहीये जो की वाड्यावर बोलावून दम देऊन रद्द करता येईल. भुकणाऱ्याकडे समाज बांधवानी लक्ष देऊ नये असेही बाळासाहेब धांइंजे यांनी बोलताना सांगितले.
फोंडशिरस येथे शनिवार ता. १० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्या निषेधार्त वेळापूरात सर्व समाजबांधवांनी मुकमोर्चाचे आयोजन केले होते. वेळापूर येथील बस स्थानकापासून सुरु झालेला मोर्चा, व्यापारी  जुने बाजारतळ मार्गे पालखी चौक येथे येऊन थांबला व पालखी चौक येथे निषेध सभा झाली.
यावेळी आर.पी.आय.चे वेळापूर शहर अध्यक्ष रजनीश बनसोडे म्हणाले की, फोंडशिरस येथे झालेली घटना घृणास्पद आहे. आमचे भांडण कोणत्याही जातीशी, समाजाशी नाही तर ते गुन्हेगारांशी आहे म्हणून आम्ही गाव बंद ठेऊन निषेध न करता मूक मोर्चा काढला पण गुन्हेगारांनी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये.
यावेळी मिलींद सरतापे यांनी शरद पवार यांच्यासह राज ठाकरे, उदयनराजे भोसले यांचेवर आपले टीकास्त्र सोडले. व झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
यावेळी तांदूळवाडीचे गायकवाड, भैय्या बाबर, सोमनाथ भोसले, विजय बनसोडे, शरद साठे, वैभव बनसोडे, हनुमंत बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
निषेध सभेनंतर मुकमोर्चा आरपीआय, वेळापूर च्या संपर्क कार्यालयाजवळ जाऊन थांबला.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेळापूरचे स.पो.नि. विजय यादव, अविनाश वाडेकर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

No comments