■ माऊलींच्या स्वागतास वेळापूर नगरी सज्ज ■

● संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज वेळापूर मुक्कामी
● लाखो वैष्णव करणार धावा
● माऊलींसमोर सादर होणार मानाचे भारुड
● उद्या ठाकूरबुवा समाधी येथे तिसरे गोल रिंगण

वेळापूर लाइव्ह टीम :

आळंदी ते पंढरपूर असा पायी वारी करत निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या दि. ११ रोजी वेळापूर मुक्कामी येणार असून सोहळ्याच्या मुक्कामाची सर्व तयारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. पालखी तळावरती वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय, लाईटची सोय, सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट्स तसेच पाणीपुरवठा, आरोग्यविभाग, केरोसीन व गॅस वितरण व्यवस्था यांचे चोख नियोजन वेळापूर ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालखी तळ व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.
यावर्षी निर्मळ वारी तर्फे वेळापूर परिसरात शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे.
आज रात्री उशिरा प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार वर्षाराणी भोसले, तलाठी गुंजाळ, सरपंच विश्वास वाघे, महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी पालखी तळाची पाहणी केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांना वेळापूर येथून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता म्हणून त्यांनी याठिकानाहून धावून विठू नामाचा धावा केला होता या आख्यायिकेवरून लाखो वैष्णव आज तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा।। असे म्हणत धावा करताना दिसतील त्याच बरोबर माऊलींच्या सायंकाळच्या विसाव्यासमोर मानाचे भारुड सादर होईल. त्यानंतर पालखी वेळापुरातील भाविकांकडून खांद्यावरती घेऊन पालखी तळावरती आणली जाईल व संध्याकाळी समाज आरती नंतर माउलींची पालखी शितोळे सरकार यांच्या तंबूत मुक्कामास असणार आहे. समाज आरती नंतर भाविकांना दर्शन सुरु राहणार आहे. वेळापूर मध्ये ठिकठिकाणी अन्नदान, औषध वाटप, मोफत रुग्णालये उपलब्ध असणार आहेत. तर वाहतूक व्यवस्था साळमुख मार्गे पंढरपूर कडे वळविण्यात येणार आहे.
पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना व पालखी सोहळ्यातील वाहने सोडून सर्वच वाहनांना व बसेस ना वेळापूर पासून पंढरपूर मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी रस्ता म्हणून मळोली मार्गे साळामुख व पंढरपूर अशी वाहतूक व्यवस्था असेल.
उद्या दि. १२ रोजी ठाकूरबुवांची समाधी येथे माऊलींचे तिसरे गोल रिंगण होणार आहे. सकाळी पहाटे ६ वाजता माउलींची पूजा होऊन पालखी रथातून ठाकूर बुवांची समाधी कडे प्रस्थान ठेवणार आहे.

★★★★★★★★★★

वेळापूर लाइव्ह टीम
वाचत राहा : www.velapurlive.blogspot.in
फेसबुक पेज लाइक करा : www.facebook.com/velapurlive

No comments