15 दिवसात 110 किलोमीटर जमिनीचे सिमांकन करा - उपमुख्यमंत्री

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या 15 दिवसात 110 किलोमीटर जागेचे सिमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशय जवळ पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने 0.25 हेक्‍टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी ही भूमिगत पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या पाईपलाईनचे काम करावे व शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

No comments