विद्यार्थ्याच्या उपचारासाठी स्वेरीकडून रुपये ३ लाख बासष्ठ हजारांची मदत
स्वेरीतून घडले माणुसकीचे दर्शन!
देणाऱ्याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत’ असे प्रसिद्ध कवी विं.दा. करंदीकरांनी म्हटले आहे त्यालाच साजेशी घटना नुकतीच घडली. त्याचे झाले असे की, योगेश कल्याण गायकवाड मु.पो.परिते (ता.माढा) येथील विद्यार्थ्याने येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये सन २०१८-१९ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी तो उत्तीर्णही झाला. दुसऱ्या वर्षाचे पहिले सत्र संपल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला. उपचारानंतर त्याला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉ. शैलेश कानमिंडे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. उपचारार्थ भरपूर खर्च येत असल्याची बातमी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यापर्यंत पोहचली. आपला विद्यार्थी मोठ्या आजाराला बळी पडला असून त्याचे वेळीच उपचार व्हावेत या हेतूने त्याला मदत करण्याचे ठरविले. डॉ. बी. पी. रोंगे यांचा शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचा ठसा सर्वत्र उमटत असतानाच योगेशला स्वेरीकडून दीड लाख रुपयांचा धनादेश तर विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून दोन लाख बारा हजार असे मिळून एकूण तीन लाख बासष्ट हजार रुपयांची रक्कम योगेशचे वडील कल्याण गायकवाड यांच्याकडे शिवजयंतीसाठी आलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या गडकोट संवर्धन समितीचे सदस्य व मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर यांच्या हस्ते सुपूर्त केली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष विजय वाघ, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम काकडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रिया झेंडे व विद्यार्थी उपस्थित होते. माणुसकीच्या नात्याने आणि दानशुर व्यक्तींना जर उपचारार्थ मदत करायची असेल तर योगेशचे वडील कल्याण गायकवाड (मोबा.७५१७२८४८९१) यांच्याशी संपर्क साधावा.
No comments