अखेर ठरलं, राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावे निश्चित
गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानी एक बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून राज्यसभेत उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते तसेच रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत देखील निश्चिती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे माजी खासदार आहेत तर आठवले यांनी आधीही मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.
राज्यसभा निवडणुकीसह राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी शहांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भाजप नेत्यांनी दुपारी भेट घेतली होती यावेळी राज्यसभेच्या जागांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यासाठीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
No comments