​कोहलीचे अग्रस्थान कायम, बुमराहची घसरण


- आयसीसीने जाहीर केलेल्या वनडेच्या ताज्या मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अग्रस्थान कायम राखले आहे तर गोलंदाजीत जसप्रित बुमराहची मात्र अग्रस्थानावरून घसरण झाली आहे.

- न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला फलंदाजीत नेहमीची चमक दाखविता आली नाही. तीन सामन्यांत मिळून त्याला फक्त 75 धावा जमविता आल्या, तरीही त्याचे अग्रस्थान कायम राहिले आहे. 

- दुखापतीमुळे रोहित शर्मा या मालिकेत खेळू शकला नाही. त्याने दुसरे स्थान मिळविले आहे. भारताविरुद्ध मालिकावीर ठरलेल्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरने एका स्थानाची प्रगती केली असून तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

- गोलंदाजीत बुमराहचे अग्रस्थान न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने मिळविले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला एकही बळी मिळविता आला नाही. त्याचा फटका त्याला बसला. त्याने 30 षटकांत 167 धावा दिल्या होत्या. या क्रमवारीत अफगाणचा मुजीब उर रहमान तिसऱया, कागिसो रबाडा चौथ्या, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर आहेत. 

- अष्टपैलूमध्ये भारताच्या रवींद्र जडेजाने तीन स्थानांची झेप घेतली असून तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोन डावात त्याने 63 धावा जमविल्या तर गोलंदाजीत 2 बळीही मिळविले. अफगाणच्या मोहम्मद नबीने अग्रस्थानावर झेप घेतली असून इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्टोक्सला विश्रांती दिल्याने त्याचा परिणाम क्रमवारीवर झाला आणि दुसऱया स्थानावर त्याची घसरण झाली.

No comments