अकलूज । अडचणीवर मात केली तर जीवन सुखकर होईल: डॉ. आबासाहेब देशमुख
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या भूगोल विभागात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात वरील उद्गार काढले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये जर एकमेकांना मदत करून पुढे गेले तर मार्ग सापडतो व जीवन सुखकर बनते. भूगोल विभागाने गेल्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा प्रमुख पाहुण्यांनी घेतला त्यामुळे आम्हाला गुणवत्तेच्या बाबतीत व या विभागांमार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल या विभागाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे सांगितले. तीव्र इच्छाशक्ती असेल तर परिवर्तन शक्य असते यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी विभागास दिलेल्या भेट वस्तुंचे कौतुक करीत भविष्यकालीन जीवनात या विषयाची आवश्यकता कशी आहे याशिवाय भविष्यातील संधींची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमांमध्ये भूगोल विभागातील सुरज शिंदे, आकाश गुजरे, कु. स्नेहल पांढरे, कु. मनाली सोनवणे,
कु. तेजस्विनी हासबे, कु.रुमाना पठाण,कु.सोनाली पिंगळे इत्यादी विद्यार्थ्यांनी व डॉ. चंद्रशेखर ताटे,डॉ.चंकेश्वर लोंढे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.संतोष गुजर यांनी केले. आभार कु.सोनाली पिंगळे हिने तर सूत्रसंचलन अक्षय मगर व गणेश माने यांनी केले .या कार्यक्रमासाठी भूगोल विभागातील प्रा.स्मिता पाटील ,प्रा.रविराज सोनवणे, प्रा. बाळासाहेब साळुंखे व भूगोल विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments