वेळापूर । श्री अर्धनारी नटेश्वराची यात्रा रद्द, पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
कोरोनो व्हायरस व त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले आदेशावरून वेळापूर, ता. माळशिरस येथील ग्रामदैवत असलेले जगप्रसिद्ध श्री अर्धनारी नटेश्वर देवाची यात्रा आज झालेल्या बैठकीत रद्द करण्यात आली.
आज सकाळी वेळापूर पोलीस स्टेशनला सपोनि दीपक जाधव यांनी बैठक बोलावली होती. यावेळी कावडीचे मानकरी व देवाचे पुजारी उपस्थित होते.
वेळापूर येथे श्री अर्धनारीनटेश्वराचे पुरातन मंदिर आहे . १२ व्या शतकात दौलताबादचे राजे रामदेवराय यादव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून चैत्र शुध्द प्रतिपदा ते चैत्र वद्य अष्टमी अशी सुमारे २२ दिवासांच्या कालावधीत ही यात्रा भरते . यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवाच्या हळदी , विवाह सोहळा व वरात हा कार्यक्रम असतो . चैत्री पाडव्याला म्हणजे बुधवार दि . २५ मार्च रोजी यात्रेला सुरुवात होते . रविवार दि . २९ रोजी सायंकाळी ४ वाजता देवाच्या हळदी , बुधवार दि . १ एप्रिल रोजी रात्रो १२ वाजता देवाचा विवाह सोहळा , बुधवार दि . ८ एप्रिल रोजी रात्रो १२ वाजता साडे , त्यानंतर देवाची पालखी व कावडी मिरवणूक ( वरात ) तर बुधवार दि १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व सायंकाळी ७ वाजता जागरण गोंधळ आदी कार्यक्रम दरवर्षी केले जातात . या कार्यक्रमासाठी वेळापूर पंचक्रोशीतील भाविकांसह राज्यातून हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावतात .
सद्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील यात्रा , जत्रा , धार्मिक , सांस्कृतीक , राजकीय कार्यक्रमावर बंदी घातली आहे . या बाबतची माहिती वेळापूरचे सपोनि दीपक जाधव यांनी दिली . पाडव्यापासून निघणारी कावडीची मिरवणूक काढू नये . देवाचे धार्मिक कार्यक्रम फक्त पुजाऱ्यांनी करावेत . कोठेही पाच पेक्षा अधिक लोक जमा होतील अशा कार्यक्रमाचे आयोजन करु नये . असे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला .
सरपंच, ग्रामसेवक, यात्रा कमिटीला निरोप नाही !
या बैठकीला वेळापूर पोलीस प्रशासनाने गावचे सरपंच, ग्रामसेवक, यात्रा उत्सवाचे नियोजन करणाऱ्या यात्रा कमिटीला निरोप न देताच बैठक घेऊन निर्णय जाहीर केला. तसेच याबाबत कोणत्याही ग्रामस्थांना व शांतता कमिटी सोबत तंटामुक्ती कमिटीला कोणताही निरोप देण्यात आला नव्हता.
No comments