shikhar shingnapur । शंभू महादेवाचे मंदिर बंद, यात्राही केली रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आल्याचे माणच्या  प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाही र केले.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी भाविकांसह सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले.

 शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा 25 मार्च ते 6 एप्रिल  कालावधी असून यात्रेसंदर्भात शिंगणापूर याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी, माणचे तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मानकरी भाविक उपस्थित होते.

शिंगणापूर यात्रेसाठी दरवर्षी 8 ते 10 लाख भाविक येत असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी यात्रेसंदर्भात प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करीत आहे, मात्र कोरोनाचे संकट ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याने त्यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिंगणापूर यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यात्रा काळातील सर्व धार्मिक उत्सव संबंधित स्थानिक पुजारी, सेवाधारी यांनी करावेत अशा सूचना देवस्थान समिती व पुजारी मंडळींना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी धज आणणे तसेच कावडी आणण्यावर प्रतिबंध असल्याचे प्रांताधिकारी जिरंगे यांनी स्पष्ट केले. यात्राकाळात एसटी मार्फत कोणतीही जादा बसवाहतूक केली जाणार नसून यात्रेच्या अनुषंगाने कोणत्याही सुविधा पुरविण्यात येणार नाहीत. कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनी यात्राकाळात शिंगणापूरमध्ये गर्दी करू नये असे आवाहन जिरंगे यांनी केले.
   शिंगणापूर यात्राकालावधीत गर्दी रोखण्यासाठी 144 कलमानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांनी सांगितले. भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून भाविकांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
     कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या शिंगणापूर यात्रा बंदीच्या निर्णयास शिंगणापूर सरपंच अभय मेनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, सर्व सदस्य, व्यावसायिक, सेवाधारी, देवस्थान समिती यासह कावडीधारक, धज मानकरी भाविकांनी पाठींबा दिला. यात्रेच्या दृष्टीने प्रशासन घेत असलेल्या निर्णयास सहकार्य करण्याचे यावेळी ग्रामस्थ व भाविकांनी सांगितले. 

शंभू महादेव मंदीर बंद
शिंगणापूर यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातल्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या परवानगीने मंगळवारी दुपारीच शंभू महादेव मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिर व्यवस्थापक ओंकार देशपांडे व पुजारी, सेवाधारी मंडळी यांनी यात्राकालावधी अखेर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जाहीर केले.


No comments