नक्षलवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक होनमाने यांच्यासह जवान शहीद
पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील क्युआरटी पथकातील पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने (वय २६) व पोलीस जवान किशोर आत्राम हे आज हुतात्मा झाले.
सकाळी ६ वाजताच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक होनमाने हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील आहेत. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
हुतात्मा धनंजय होनमाने यांचे गावातील एका मुलीशी विवाह ठरला होता. सुट्टीवर आल्यानंतर पुढच्या महिन्यात विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तानाजी होनमाने हे शेतकरी कुटुंब. त्यांना विकास आणि धनंजय होनमाने ही दोन मुले. धनंजय हा लहानपणापासूनच हुशार होता. पोलिस खात्यामध्ये भरती होवून देश सेवा करण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो तीन वर्षापूर्वी क्युआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी भरती झाला. धोरला भाऊ विकास हा उच्चशिक्षण घेत आहे. वडील तानाजी होनमाने आणि आई पुळज येथेच शेती करतात. अत्यंत हालाखीमध्ये धनंजयने आपले प्राथमिक शिक्षण पुळूज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. त्यानंतर तो पोलिस खात्यामध्ये भरती झाला.
No comments