सोलापूर । दारू विक्री साठी आता दुकानदारांचा पुढाकार
सोलापूर जिल्ह्यात दारू विक्री सुरू करण्यासाठी आता दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी पुढाकार घेतला आहे. गेली तीन ते चार महिने दुकाने बंद असल्याने मोठे नुकसान होत असून सगळीकडे दुकाने सुरू होत आहेत तसेच सोलापूरात ही दुकाने सुरू व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेच्या वतीने सोमेश क्षीरसागर यांनी याबाबत निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, सर्व दारू विक्रेत्यांनी नुतुनीकरण शुल्क भरले असून अनलॉक 1 अंतर्गत अनेक आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. नूतनीकरण शुल्क भरून ही दुकाने बंदच आहेत, त्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचण तर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास ही दुकानदारांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
त्याचबरोबर जानेवारी, फेब्रुवारी मध्ये खरेदी केलेली बिअर ची एक्सपायरी डेट ही संपत आली आहे त्यामुळे जर दुकाने सुरू करायला वेळ लागला तर हा माल विक्री अयोग्य झालेवर नष्ट करावा लागणार आहे. आधीच दुकाने बंद असल्याने आर्थिक उलाढाल थांबली असून जर माल नष्ट करायची वेळ आली तर मोठे आर्थिक संकट येणार आहे.
त्यामुळे सोलापूरातील दारू विक्रीची दुकाने ही सुरू व्हावीत. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतायेत याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
No comments