तडीपार गुंडांनी केला अकलूजच्या युवकाचा खून


सोलापूर जिल्ह्यातून 10 दिवसांपूर्वी तडीपार केलेल्या अकलूजच्या आरोपींनी सराटी (ता. इंदापूर) येथे केलेल्या हल्ल्यात जखमी अक्षय राजेंद्र चंदनशिवे (वय 22, रा. रमामाता चौक, अकलूज) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सात जणांविरुद्ध पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. 
घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी आकाश ऊर्फ अण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रूपनवर, विकास महेश शिंदे, नितीन ऊर्फ पप्पू बाळू पवार, सिद्धांत नानासाहेब ताकतोडे (सर्व रा. व्यंकटनगर, अकलूज), रहिमान ऊर्फ सुलतान दिलावर बागवान (रा. जुने बाजारतळ, अकलूज) यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली होती. शुक्रवारी (ता. 14) युवराज गायकवाड, अभिषेक गायकवाड, सोजल गायकवाड, मनोज गायकवाड, सुहास गायकवाड, नीलेश लोखंडे असे सर्वजण भांडगाव (ता. इंदापूर) येथे जेवणासाठी गेले होते. अक्षय राजेंद्र चंदनशिवे हा इंदापूर येथे लग्नासाठी गेला होता. हे सर्वजण बावडा (ता. इंदापूर) येथे एकत्र भेटल्यानंतर दुचाकीवर अकलूजला येताना सराटी गावाजवळील जिजामाता शाळेजवळ रस्त्यावर साडेचार वाजताच्या सुमारास आकाश ऊर्फ अण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रूपनवर, विकास महेश शिंदे, नितीन ऊर्फ पप्पू बाळू पवार, सिद्धांत नानासाहेब ताकतोडे, रहिमान ऊर्फ सुलतान दिलावर यांनी पाठलाग करून व रस्त्याला गाड्या आडव्या लावून थांबले. 
तुम्ही एकत्र का फिरता असे म्हणत जवळ येत, तुमच्या गाड्या थांबवा. तुम्हाला मस्ती आली आहे का, थांबा नाहीतर तुम्हाला जिवंतच ठेवत नाही असे म्हणत स्टील पाइप, लोखंडी टॉमी, काठ्यानी अक्षय चंदनशिवे यास मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी आदर्श गायकवाड सोडवण्यास गेला असता त्यालाही मारहाण केली. अन्य सर्व माराच्या भितीने पळून गेले. अक्षयच्या हातावर, डोक्‍यात, पायावर, पाठीत मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोर हल्ला करून इंदापूरच्या दिशेने पळून गेल्यानंतर अक्षयच्या मित्रांनी त्यास अकलूज येथे उपचारास आणले होते. अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (ता. 15) पहाटे पाचच्या सुमारास अक्षय चंदनशिवे यांचा मृत्यू झाला. 
आदर्श दीपक गायकवाड (रा. अकलूज) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश ऊर्फ अण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रूपनवर, विकास महेश शिंदे, नितीन ऊर्फ पप्पू बाळू पवार, सिद्धांत नानासाहेब ताकतोडे, रहिमान ऊर्फ सुलतान दिलावर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमांप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. घटना इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत घडला असल्याने अकलूज पोलिसांनी पुढील तपासाकरता इंदापूर पोलिस ठाणे येथे वर्ग केला आहे.

No comments