भाजपला धक्का, चार नगरसेवक जाणार शिवसेनेत !
नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. 4 नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चारही नगरसेवक शिवबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केलेली असताना भाजपला धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी तुर्भेतील भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्यानंतर भाजपला गळती लागल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांच्या पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.
No comments