वेळापूर मठाचे उत्तराधिकारीपदी शिवराज शर्मा यांची निवड । मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची घोषणा


गुरू परंपरा अखंडीत राहण्यासाठी गुरूगादीस वारस असणे गरजेचे असते. त्याप्रमाणे वेळापूर येथील श्री सदाशिव स्वामी गुरूमुक्तेश्वर वेळापूर स्वामी मठाच्या गादीवर होटगी मठातील शिष्य शिवराज शर्मा यांची सर्वांच्या अनुमतीने उत्तराधीकारी म्हणून निवड केल्याचे श्री श्री 108 सद्गुरू मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जाहिर केले.
श्री श्री श्री 1008 आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य अवतार दिन उत्सवास दि.4 मार्च रोजी प्रारंभ झाला होता. त्याची आज दि.8 रोजी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य यांच्या पालखी सोहळ्याने व पुष्पवृष्ठीने सांगता झाली. यावेळी  श्री श्री 108 शिवलिंग शिवाचार्य महास्वामी, बेळंकी, श्री श्री 108 शिवशंकर शिवाचार्य महास्वामी, नेरपिंगळाई, होटगी मठाचे सचिव शांतय्या स्वामी, मातय्या स्वामी, कुमार स्वामी गणाचार्य, 
शिवराज शर्मा यांचे वडील चिदानंद स्वामी, आई निता स्वामी, विठ्ठल बागल, सागर स्वामी, ॲड. झाडे, भैय्या मिरगे, चंद्रकांत कुंभार, सुरेश वाळके यांच्यासह भाविक उपस्थित होते.
मुक्तेश्वर स्वामी म्हणाले, शिवराज शर्मा यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील यात शंका नाही.
शिवलिंग शिवाचार्य महास्वामी म्हणाले, शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नति व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूति देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसून ते केवळ आध्यात्मिक उन्नतीकडेच असते. ‘शिव आणि भक्त वेगळे असत नाहीत; पण शिव निर्गुण असल्यामुळे त्याला देहभाव असलेल्या भक्ताशी बोलता येत नाही; म्हणून तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. त्या कार्यब्रह्मालाच गुरु असे म्हणतात; म्हणजेच गुरूंच्या रूपाने तोच बोलत असतो असे ते म्हणाले.
यावेळी 35 भाविकांनी दिक्षा घेतली. वीरशैव लिंगायत जंगम व सर्व पोटजातींचा वधूवर मेळावा पार पडला. या मेळाव्यात 100 विवाह इच्छुक युवक-युवतींनी नोंदणी केली.


No comments