solapur । 'कोरोना'संदर्भात विद्यार्थी, नागरिकांनी जागरूक राहावे, कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड- 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील अध्यापनाचे कार्य बंद ठेवण्यात आले आहे, परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना संदर्भात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, चीनमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगभर पसरला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठात होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयातील ग्रंथालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, वस्तीग्रहही बंद आहेत. सध्या महाराष्ट्रासाठी दोन आठवडे महत्त्वाचे असल्याने सर्वांनी कोरोना संदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे. 

कोरोना विषाणूच्या संरक्षणासाठी विद्यार्थी व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडाला रुमाल अथवा मास्क बांधणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, त्याचबरोबर खोकला व सर्दी असणाऱ्या नागरिकांशी नजीकचा संपर्क टाळावा(किमान 3 फूट), थंड पदार्थ खाण्याचे टाळावे, कोमट पाणी पिण्याबरोबरच मिठाचे तसेच हळदीच्या गुळण्या करून स्वतःच्या संरक्षणासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी म्हटले आहे. भारतीय जीवनशैलीचा वापर करा व हात जोडून नमस्कार करा. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कारसारखा व्यायाम करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजार असल्यास योग्य तो उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.


विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग अभ्यासासाठी करावा
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 31 मार्चपर्यंतच्या सर्व नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अध्यापनाचे कार्य बंद ठेवण्यात आल्याने महाविद्यालय व विद्यापीठ बंद आहेत. विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाल्यामुळे त्यांनी बाहेर फिरायला न जाता घरी राहून अभ्यास करावे. अभ्यासाबरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसा व्यायाम करावा. विविध चांगली पुस्तके वाचत या सुट्टीचा सदुपयोग करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे.

No comments