वेळापूरातील १९४ शेतकऱ्यांना १ कोटी ७७ लाखाची कर्जमाफी

>
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत माळशिरस तालुक्यातील ११ हजार ६४६ शेतकऱ्यांपैकी १९४ शेतकऱ्यांना सुमारे  १ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे .
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेचा आज ( सोमवार )  सकाळी दहा वाजता वेळापूर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यालयात प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते शुभारंभ झाला . दोन लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला . वेळापूर विकास सोसायटीच्या कर्जदार गजराबाई दत्तात्रय बनकर यांना आधार प्रामाणिकरण केलेल्या यादीद्वारे प्रसिद्ध केलेल्या यादीतील कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले . यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील , सहाय्यक निंबधक डी . एच . मिसाळ , डी . पी . राऊत , मंडलाधिकारी व्ही . ए . रणसुभे , जिल्हा बॅंकेचे शाखाधिकारी एल . डी . पिसे , सिनीयर बॅंक इंस्पेक्टर यू . एम . दीक्षित , वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख , व्हा . चेअरमन महादेव ताटे , उघडेवाडी सोसायटीचे चेअरमन अजितसिंह माने देशमुख , तुकाराम मोहिते ,  धानोरे सोसायटीचे चेअरमन तुकाराम भुसारे , भाकरेवाडी सोसायटीचे चेअरमन महादेव चव्हाण , पिसेवाडीचे चेअरमन दशरथ बनकर ,  सचिव भागवत मिले , दीपक माळवदकर ,  अशोक साबळे , बाळासाहेब माने देशमुख  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते . 

प्रांताधिकारी पवार म्हणाल्या , राज्य शासनाच्या दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफी योजनेत प्रायोगिक तत्वावर सोलापूर जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली होती . माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावातील १९४ शेतकरी या योजनेत पात्र ठरले . वेळापूर येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत तीन ठिकाणी , बॅंक ऑफ बडोदा व प्रगती महा ई सेवा केंद्र येथे अधार प्रामाणिकरण केंद्र सुरु करण्यात आले . आज दिवसभरात १९४ पैकी सुमारे १४८ शेतकऱ्यांनी अधार प्रमाणीकरण पत्र मिळविले आहे . उर्वरीत लाभार्थीनाही उद्या या केंद्रावर अधार प्रामाणिकरण पत्र मिळेल . ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे . 
सहाय्यक निबंधक मिसाळ म्हणाले , दोन लाखापर्यत कर्ज घेतलेले ११ हजार ६४६ शेतकरी आहेत . त्यापैकी सुमारे ६११ शेतकरी हे विविध संस्थावर पदाधिकारी , अधिकारी आहेत . त्यांचे उत्पन्न  २५ हजार रुपये पेक्षा अधिक उत्पन्न गटातील आहे . त्यामूळे ते ६११ शेतकरी अपात्र ठरले आहेत . उर्वरीत ११ हजार ३५ शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे . 
तहसिलदार पाटील म्हणाले , शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती बॅंक , राष्ट्रीयकृत बॅंक , तलाठी , ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहेत . तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर कर्जमाफीचा संदेश पाठविला जाणार आहे . संदेश प्राप्त होताच शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले .

No comments